लंडन - इंग्लंडमध्ये सद्या टी-२० स्पर्धा विटालिटी ब्लास्टची धूम पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील सामने रोमांचक होत आहेत. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्ड्स मैदानावर असाच एक रोमांचक सामना पार पडला. ज्यात प्रत्येक चेंडूवर रोमांच पाहायला मिळाला. एसेक्स क्लब आणि मिडिलसेक्स क्लब यांच्यात हा सामना झाला.
एसेक्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज स्टीवी एस्कीनाजीने फटकेबाजी केली. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीज्या जोरावर मिडिलसेक्स संघाने निर्धारित २० षटकात २ बाद १८३ धावांचे आव्हान उभारले.
मिडिलसेक्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना एसेक्स संघाने ४६ धावांत आपले दोन गडी गमावले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या इंग्लंडच्या २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू डॅन लॉरेंन्स याने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याच्या या खेळीमुळे एसेक्सच्या विजयाच्या आशा कायम होत्या. त्याला मायकल पेप्पर याने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. पेप्पर १३ व्या षटकात ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
अखेरच्या २ षटके बाकी आणि सुरू झाला रोमांच
एसेक्स संघाला विजयासाठी अखेरच्या दोन षटकात १६ धावांची गरज होती. त्याचे फक्त ३ गडी बाद झाले होते. त्यामुळे एसेक्स संघ सहज सामना जिंकेल असे वाटत होते. परंतु, १९व्या षटकात टॉम हेल्मने दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे डेन (५९) आणि जेम्स निशम (३०) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. टॉमने या षटकात फक्त ७ धावा दिल्या.