महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ENGW vs INDW १st ODI: टॅमी-नतालीची तुफानी खेळी; इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव - Nat Sciver

इंग्लंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. सलामीवीर टॅमी ब्यूमोंट (८७) आणि नताली सीवर (७४) या दोघींनी नाबाद वैयक्तिक अर्धशतकी खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

england women beat indian women by 8 wickets in 1st odi at bristol
ENGW vs INDW १st ODI: टॅमी-नतालीची तुफानी खेळी; इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव

By

Published : Jun 27, 2021, 10:09 PM IST

ब्रिस्टोल - सलामीवीर टॅमी ब्यूमोंट (८७) आणि नताली सीवर (७४) या दोघींच्या नाबाद वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ८ बाद २०१ धावा केल्या होत्या. भारताने दिलेले हे आव्हान इंग्लंडने टॅमी आणि नतालीने तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीच्या जोरावर ३४.५ षटकात दोन गड्याचा मोबदल्यात सहज पूर्ण केले. इंग्लंडने या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. लॉरेन विनफील्ड-हिलला (१६) झूलन गोस्वामीने तानिया भाटिया करवी झेलबाद केलं. त्यानंतर कर्णधार हीथर नाइट आणि टॅमी ब्यूमोंट यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या शतकासमीप नेली. तेव्हा एकता बिश्तने नाइटला (१८) क्लिन बोल्ड करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. नाइट बाद झाल्यानंतर आलेल्या नतालीने टॅमी ब्यूमोंटला चांगली साथ दिली. दोघींनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघींनी आपले वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. तिसऱ्या गड्यासाठी दोघींनी नाबाद ११९ धावांची भागिदारी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. टॅमी ब्यूमोंटने ८७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८७ धावांची खेळी साकारली. तर नताली ७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ७४ धावांवर नाबाद राहिली.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात पहिला एकदिवसीय सामना ब्रिस्टोल येथे खेळला गेला. इंग्लंडची कर्णधार हीथर नाईट हिने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा भारताकडून शफाली वर्माने डेब्यू केला. इंग्लंडकडून सोफिया डंकले ही पदार्पणाचा सामना खेळत आहे. भारताची या सामन्यात सुरूवात खराब झाली. पदार्पणाचा सामना खेळणारी शफाली वर्मा १५ धावा काढून बाद झाली. त्यापाठोपाठ मराठमोळी स्मृती मंधाना (१०) माघारी परतली.

कर्णधार मिताली राजने तेव्हा एक बाजू लावून धरत ७२ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने त्याला म्हणावी तशी साथ लाभली नाही. पूनम राऊत (३२), हरमनप्रीत कौर (१), दीप्ती शर्मा (३०) ठराविक अंतराने बाद झाले. मिताली बाद झाल्यानंतर तर भारताचा डाव गडगडला आणि भारताला निर्धारित ५० षटकात ८ बाद २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. सोपिया एक्लेस्टोन हिने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर कॅथरिन ब्रंट आणि अन्या श्रुबसोले यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. केट क्रास हिने एक गडी टिपला.

हेही वाचा -बेन स्टोक्सने जुना हिशोब केला चुकता; ब्रेथवेटला चोपलं, पाहा व्हिडिओ

हेही वाचा -ENGW vs INDW : शफाली वर्माने भारतीय दिग्गजांना जमला नाही, केला असा रेकार्ड

ABOUT THE AUTHOR

...view details