लीड्स - इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला भारतीय संघ 2 बाद 215 असा सुस्थितीत होता. पण त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ 278 धावांत ऑलआउट झाला आणि भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 7 गडी बाद करणारा ऑली रॉबिन्सन सामनावीर ठरला. त्याने चौथ्या दिवशी नव्या चेंडूवर भारतीय दिग्गजांना अक्षरश: नाचवले. या डावात त्याने 26 षटके गोलंदाजी करताना 65 धावा देत 5 गडी बाद केले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने विजयानंतर बोलताना सांगितलं की, 'अनुभवी साथीदार जेम्स अँडरसन याने मला वॉबल ग्रीप बॉलची टेकनिक बदलण्यात मदत केली. ज्याचे परिणाम भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले.'
मी पाहिलं की, जेम्स अँडरसनने गोलंदाजी करताना वॉबल ग्रीप थोडेसे वेगळ्या पद्धतीने पकडले होते. मी याला दुसऱ्या बाजूने पकडत होतो. यामुळे मी याविषयावर अँडरसनशी चर्चा केली. तेव्हा त्याने सांगितलेल्या प्रकारे नेटमध्ये सराव केला. यानंतर याचा वापर मी सामन्यात केला आणि याचा फायदाही झाला. हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण माझ्या पहिल्या कसोटीतच विजय मिळाला, असे देखील रॉबिन्सन बोलताना म्हणाला.