चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना रंगतआहे. पहिल्या कसोटीतील मोठ्या पराभवानंतर विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या कसोटीत विजयाची अपेक्षा आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी विराटसेनेला इंग्लंडबरोबरील दोन सामने आणि सोबतच मालिका जिंकण्याचे आव्हान असेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाने आपले स्थान यापूर्वीच निश्चित केल्यामुळे समोरच्या बाकावर कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने भारताविरुद्धचा हा कसोटी सामना जिंकल्यास भारताची अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा जवळपास संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होईल.
विराटच्या नेतृत्वात भारताने गेल्या दोन महिन्यांत दोन कसोटी सामने गमावले आहेत. तर, कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला नमवले. रहाणेकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील पराभव या चर्चेला अधिक उत्तेजन देईल.