अहमदाबाद -जागतिक टी-२० क्रमवारीतील अव्वल दोन संघ आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकासंमोर उभे ठाकणार आहेत. आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने ३-१ अशी खिशात टाकली. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेली विराटसेना टी-२० मालिकाही जिंकण्याच्या उद्देशाने खेळेल. आज सायंकाळी ७ वाजता उभय संघातील पहिला सामना खेळवण्यात येईल.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव हा आजच्या सामन्यातून पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या विविध स्पर्धांमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या सूर्यकुमारला खूप कालावधीनंतर टीम इंडियाचे दार खुले झाले आहे. कसोटी मालिकेत धुवांधार प्रदर्शन केलेला रिषभ पंतही या मालिकेत आकर्षण असेल.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघेजण भारतासाठी सलामी देतील, असे संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले होते. त्यामुळे डावखुऱ्या शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १४ टी-२० सामने झाले असून दोघांनीही प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत.
इंग्लंडच्या संघातील १६ सदस्यांपैकी १३ जणांना भारतात विविध संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. यात कर्णधार इयान मॉर्गनव्यतिरिक्त, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. भारतात यंदा ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. त्यामुळे संघबांधणी करण्याच्या उद्देशामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.