चेन्नई -चेपॉक मैदानात सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या डावाची दाणादाण उडाली आहे. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचे तिसऱ्या दिवसअखेर ५३ धावांत ३ फलंदाज माघारी परतले. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनच्या शतकामुळे भारताने इंग्लंडसमोर विशाल आव्हान ठेवले. इंग्लंडचा संघ अजून ४२९ धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचे उर्वरित फलंदाज आव्हान पेलतात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फिरकीपटूंसमोर बिथरले इंग्लंडचे शिलेदार...
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या रोरी बर्न्सने इशांत शर्माच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, दुसऱ्या बाजूला असलेल्या डॉमिनिक सिब्लेला फिरकीपटू अक्षर पटेलने पायचित पकडले. सिब्लेने ३ धावा केल्या. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या रोरी बर्न्सला अश्विनने विराटकरवी झेलबाद केले. नाईट वॉचमन म्हणून बढती मिळालेला जॅक लीच शुन्यावर बाद झाला. अक्षरला लीचच्या रुपात दुसरा बळी मिळाला. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज बिथरताना दिसले. दिवस संपण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रूटला 'अंपायर्स कॉल'मुळे एक जीवदान मिळाले. खेळ थांबला तेव्हा रूट २ तर, डॅनियल लॉरेन्स १९ धावांवर नाबाद होते.
आज तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २८६ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे विशाल आव्हान दिले आहे. दुसऱ्या दिवसअखेर, भारताने शुबमन गिलला गमावत १ बाद ५४ धावा केल्या होत्या. आज सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. मात्र, लीचच्या गोलंदाजीवर पुजारा धावबाद झाला. त्याने ७ धावा केल्या. मागील डावात दीडशतकी खेळी केलेला रोहितही अपयशी ठरला. लीचच्या गोलंदाजीवर रोहित (२६) यष्टिचित झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या रिषभ पंतला या डावात बढती मिळाली. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तोसुद्धा आपला बळी देऊन बसला. लीचने त्याला वैयक्तिक ८ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेलही स्वस्तात बाद झाले.