चेन्नई -जॅक लीच आणि जेम्स अँडरसनच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला सर्वबाद करत पहिल्या कसोटीत मोठा विजय नोंदवला आहे. इंग्लडने भारताला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघ दुसऱ्या डावात १९२ धावाच करू शकला. त्यामुळे इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात द्विशकी खेळी साकारणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
काल म्हणजेच चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवर रोहित शर्मा अपयशी ठरला. जॅक लिचच्या गोलंदाजीवर तो १२ धावांवर त्रिफाळाचित झाला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा अवघ्या १५ धावांची भर घालून तंबूत परतला. जॅक लीचने त्याला स्टोक्सकरवी झेलबाद केले. तर, लयात आलेल्या शुबमन गिलला अँडरसनने बाद केले. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. ३८ वर्षीय अँडरसनने अप्रतिम चेंडू टाकत त्याची दांडी गुल केली. पहिल्या डावात सुंदर खेळी केलेले रिषभ पंत (११) आणि वॉशिंग्टन सुंदर (०) या डावात अपयशी ठरले. अँडरसनने पंतला बाद केले.
हेही वाचा - ''आमच्या शेतकरी बापासाठी...'', सचिनच्या घराबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन