चेन्नई -चेपॉक येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने आपली दमदार फलंदाजी सुरूच ठेवली आहे. चहापानापर्यंत इंग्लंडने १४७ षटकात ४ बाद ४५४ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या सत्रात बेन स्टोक्सला बाद करता आले. तर, कर्णधार जो रूटने आपल्या १००व्या कसोटीत झंझवाती द्विशतक ठोकले. रूटने ३५३ चेंडू खेळत नाबाद २०९ धावा फटकावल्या आहेत. या मॅरेथॉन खेळीत त्याने १९ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली आहे. रूटसोबत ओली पोप २४ धावांवर मैदानावर स्थिरावला आहे.
रूटचा भीमपराक्रम -
रूटसोबत फलंदाजीला आलेल्या स्टोक्सने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. फिरकीपटू शाहबाझ नदीमने त्याला पुजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेला ओली पोप रूटसोबत स्थिरावला आहे. जो रुटने भारताविरुद्ध १४३ व्या षटकात आर अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. कारकिर्दीतील १००व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा रुट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला असा पराक्रम करता आलेला नाही.
पहिले सत्र -
आज पहिल्या सत्रात इंग्लंडने एकूण ९२ धावा केल्या. या सत्रात भारतीय खेळाडूंनी बर्याच संधी गमावल्या. बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी आलेल्या तीन संधी भारताने गमावल्या. याचा पुरेपूर फायदा घेत स्टोक्सने शानदार अर्धशतक झळकावले.
पहिला दिवशी पाहुण्यांचा बोलबाला -
या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्लेने फलंदाजीची सुरुवात केली. दुसऱ्या षटकात बर्न्सला जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक रिषभ पंतकडून जीवदान मिळाले. पहिल्या २० षटकांत भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. या दोन्ही सलामीवीरांनी २० षटकात इंग्लंडला ५० धावांचा टप्पाही पार करून दिला. त्यानंतर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने बर्न्सला बाद केले. बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनिएल लॉरेन्सला जसप्रीत बुमराहने पायचित पकडले. लॉरेन्स शुन्यावर बाद झाला.
हेही वाचा - जाँटी ऱ्होड्सचे ट्विटर अकाउंट हॅक!..सचिनचे 'ते' ट्विट झाले पोस्ट
त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आपल्या १००व्या कसोटी सामन्यात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने सिब्लेला हाताशी धरत धावफलकावर पकड घेण्यास सुरुवात केली. रूटने त्याचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक खेळ केला. त्याने ७८व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरविरुद्ध खेळताना १६४ चेंडूत शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २०वे शतक ठरले. सिब्लेने तब्बल २८६ चेंडू खेळून काढत ८७ धावा केल्या. यात त्याच्या १२ चौकारांचा समावेश होता. शतकाच्या जवळ पोहोचलेल्या सिब्लेला बुमराहने पायचित पकडले. भारताकडून अश्विनने एक तर बुमराहने दोन बळी घेतले.