चेन्नई -चेपॉक मैदानावर आजापासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या रोहित शर्माने दमदार शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहितने अजिंक्यला हाताशी घेत कोलमडलेल्या संघाला आधार दिला. तीन फलंदाज बाद झाले असताना कोणताही दबाव न घेता आक्रमक रोहितने कसोटी कारकिर्दीचे सातवे शतक पूर्ण केले. या शतकासोबत रोहितच्या नावावर खास विक्रमांची नोंद झाली आहे.
देशात सर्व कसोटी शतके...
सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत सर्व कसोटी शतके भारतात केली आहेत. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननने देशात सहा शतके ठोकल्यानंतर परदेशात सातवे शतक ठोकले होते. जागतिक स्तरावर, बांगलादेशच्या मोमीनुल हकने देशात प्रथम दहा शतके ठोकली आहेत. या विक्रमात रोहितचे दुसर्या क्रमांकावर आहे. यानंतर एफ.एस. जॅक्सन, चंदू बोर्डे आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांची नावे आहेत.
अशी कामगिरी करणारा रोहित पहिला खेळाडू...
२०१९मध्ये रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकले होते. आता त्याने ९ डाव, आणि १५ महिन्यांनंतर शतक झळकावले आहे. चेन्नईमधील हे त्याचे पहिले शतक आहे. श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चार संघांविरूद्ध क्रिकेटच्या सर्व प्रकारात शतक ठोकणारा रोहित जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.