चेन्नई -चेपॉक मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच विराटसेनेने इंग्लंडची भंबेरी उडवत पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढला. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १६४ धावांत आटोपला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवणाऱ्या भारताच्या रवीचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
चौथा दिवस भारताचा...
कालच्या ३ बाद ५३ धावांवरून इंग्लंडने आज चौथ्या दिवशी पुढे खेळण्यास सुरुवात केली. डॅनियल लॉरेन्स व कर्णधार जो रूटकडून संघाला चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. पण, अश्विनने ही जोडी फोडली. अश्विनने लॉरेन्सला बाद करत इंग्लंडला चौथा झटका दिला. लॉरेन्स २६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला बेन स्टोक्सही ८ धावांवर तंबूत परतला. अश्विननेच स्टोक्सला बाद केले. त्यानंतर आलेला ओली पोप पदार्पणवीर अक्षर पटेलचा बळी ठरला. तर, बेन फोक्सला कुलदीप यादवने बाद केले. मैदानात स्थिरावलेला कर्णधार रूटनेही विजयाची आशा सोडली. अक्षरने त्याला ३३ धावांवर बाद केले. उपारापर्यंत इंग्लंडचे सात फलंदाज तंबूत परतले. दुसऱ्या सत्रात मोईन अलीने फटकेबाजी करत भारताचा विजय लांबवला. मोईन अलीने १८ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ४३ धावा केल्या. कुलदीपच्या वळलेल्या चेंडूवर तो यष्टिचित झाला आणि इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. भारताकडून अक्षरने ६० धावांत ५ बळी घेतले. तर, अश्विनला ३ बळी घेता आले. कुलदीप यादवला २ बळी मिळाले.