हैदराबाद -लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव 346 धावांत आटोपला आहे. जलदगती गोलंदाज जेम्स अंडरसन ने 62 धावात पाच विकेट घेत भारताच्या धावसंख्येला आळा घातला. पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या तीन बाद 276 धावा होत्या.
भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलने 250 चेंडूत 12 चौकार व एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 129 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून अंडरसनशिवाय ओली रॉबिंसन आणि मार्क वुडने भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या, तर मोइन अलीला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी भारताने पहिल्या दिवशी केलेल्या 3 बाद 276 धावांवर खेळ पुढे सुरू करत राहुलने 127 तर रहाणेने कालच्या नाबाद 1 धावेवरून पुढे खेळ सुरू केला. राहुल कालच्या धावसंख्यात दोन धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर रहाणेने आज एकही धाव न करता केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि जडेजाने भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. पंतला वुडने तंबूत धाडले. त्याने 58 चेंडूत 37 धावा केल्या.
पंत बाद होताच मोहम्मद शमी भोपळाही न फोडता माघारी परतला. उपहारापर्यंत भारतीय फलंदाजी कोसळली. अंडरसनने इशांत शर्मा (8) आणि जसप्रीत बुमराह (0) ला स्वस्तात माघारी धाडले. वुडने रवींद्र जडेजाला बाद करत भारतीय डाव संपवला. जडेजाने 120 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 40 धावांचे योगदान दिले.