चेन्नई -भारताविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर उभय संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) म्हणण्यानुसार, जोफ्रा आर्चरला उजव्या हाताला इंजेक्शन देण्यात आले आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. चेन्नईतील पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी मोठा विजय साकारला. या सामन्यात आर्चरने तीन गडी बाद केले. मात्र, त्याला आर्चरला दुखापतीला सामोरे जावे लागले.
ईसीबीच्या म्हणण्यानुसार, "हे प्रकरण कोणत्याही पूर्वीच्या दुखापतीशी संबंधित नाही. आम्हाला आशा आहे की, आर्चर तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होईल." गेल्या आठवड्यात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलेला उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी वगळण्यात आले होते.