लंडन : सध्या वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (England tour of West Indies) येणार आहे. या मालिकेला 8 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आता वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मागील मालिकेतील यशस्वी गोलंदाज जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा या संघात समावेश केला नाही.
अॅशेस मालिकेत खेळलेल्या संघात तब्बल सहा बदल करण्यात आले आहेत. मलान, डोम बेस, सॅम बिलिंग्स, रॉरी बर्न्स, जोस बटलर आणि हसीब हमीद यांसारख्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली नाही. डरहमचा सलामीवीर अॅलेक्स लीस आणि यॉर्कशायरचा वेगवान गोलंदाज मॅथू फिशर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच अनकॅप्ड साकिब महमूद (Uncapped Saqib Mahmood) आणि मॅट पार्किंसन यांना देखील संघात जागा मिळाली आहे. त्याचबरोबर बेन फोक्सचे ही संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो यष्टीरक्षक प्रथम चॉइस असणार आहे.
या दौऱ्यात इंग्लंड संघाच्या नेतृत्वाची धुरा जो रुटच्या (Joe Root leads the England team) खांद्यावर असणार आहे. त्याचबरोबर उपकर्णधाराची जबाबदारी बेन स्टोक्सच्या खांद्यावर असणार आहे. तर जॉनी बेयरेस्टो संघात आपली कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त ओली रॉबिन्सन आणि मार्क वूड सारख्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.