महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ENG W vs IND W २nd ODI: इंग्लंडकडून भारताचा पाच विकेट्सने पराभव, मालिकाही गमावली

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघाचा ५ गडी राखून पराभव केला.

ENG-W vs IND-W 2nd ODI : england-women-beat-indian-women-cricket-team-in-second-women-odi-at-taunton
ENG-W vs IND-W 2nd ODI: टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव, मालिकाही गमावली

By

Published : Jul 1, 2021, 4:00 PM IST

टाउंटन - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघाचा ५ गडी राखून पराभव केला. कर्णधार मिताली राजने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. परंतु तिला दुसऱ्या बाजूने योग्य साथ न लाभल्याने, तसेच केट क्रॉट हिच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला २२१ धावांत गुंडाळले. त्यानंतर इंग्लंडने हे लक्ष्य ४७.३ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. इंग्लंडने या विजयासह ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. मालिकेतील अखेरचा सामना वोर्चेस्टर येथे ३ जुलैला होणार आहे.

पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल केले. पूनम राऊत, पूजार वस्त्राकार आणि एकता बिष्ट यांच्या जागेवर जेमिमा रोड्रिक्स, स्नेह राणा आणि पूनम यादव यांना अंतिम संघात स्थान मिळाले. दुसरीकडे इंग्लंड विजयी संघासह मैदानात उतरला. इंग्लंडची कर्णधार हीथर नाइट हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

युवा शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या जोडीने ५४ धावांची सलामी दिली. त्यानंतर भारताने २१ धावांत ३ गडी गमावले. तेव्हा मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या जोडीने चौथ्या गड्यासाठी ६८ धावांची भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मिताली राजने ९२ चेंडूत सर्वाधिक ५९ धावा केल्या. तर शफाली ४४ धावांवर बाद झाली. केट क्रॉस हिने १० षटकात ३४ धावा देत भारताचे ५ गडी बाद केले. तर सोफी एक्लेस्टोनने ३ गडी बाद केले. नतालीला एक विकेट मिळाली.

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची अवस्था ९२ धावांत ४ बाद अशी झाली. हीथर नाइटसह इंग्लंडचे प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. तेव्हा एमी जोन्स आणि सोफिया डंकली या जोडीने भागिदारी करत इंग्लंडच्या आशा पल्लवीत ठेवल्या. सोफियाने ८१ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर जोन्स २८ धावांवर बाद झाली. त्यानंतर कॅथरीन ब्रंटने नाबाद ३३ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना ४७.३ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात जिंकला.

हेही वाचा -जुग जुग जीयो ! सोनू सूदने गरजू नेमबाजला पाठवली महागडी रायफल

हेही वाचा -जिद्दीला सॅल्युट! शेतात भालाफेक शिकलेली अन्नू राणी टोकियो ऑलिम्पिकला पात्र

ABOUT THE AUTHOR

...view details