महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Eng W vs Ind W: भारताने मालिका गमावली, इंग्लंडचा ८ गडी राखून विजय - महिला क्रिकेट

भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात पराभव पत्कारावा लागला. इंग्लंड संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकत मालिका २-१ ने खिशात घातली.

England Women Beat India Women In 3rd T20I BY 8 WICKETS and win series 2-1
Eng W vs Ind W: भारताने मालिका गमावली, इंग्लंडचा ८ गड्यांनी विजय

By

Published : Jul 15, 2021, 5:57 AM IST

चेम्सफोर्ड - भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात दारूण पराभव पत्कारावा लागला. इंग्लंड संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकत मालिका २-१ ने खिशात घातली. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडने हे आव्हान १८.४ षटकात दोन गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. डॅनियल वॅट हिने नाबाद ८९ धावांची खेळी करत भारताच्या मालिका विजयाच्या आशेवर पाणी फेरले.

चेम्सफोर्डच्या काउंटी ग्राउंडमध्ये रंगलेल्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताची स्फोटक सलामीवीर शफाली वर्मा शून्यावर माघारी परतली. तिला कॅथरिन ब्रंटने क्लिन बोल्ड केले. त्यानंतर हरलीन देओल (६) देखील स्वस्तात बाद झाली. तेव्हा स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताचा डाव सावरला. दोघींनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली.

सिवरने हरमनप्रीतला पायचित करत भारताला तिसरा धक्का दिला. हरमनप्रीतने २६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर अष्टपैलू स्नेह राणा अवघ्या ४ धावा करत बाद झाली. एका बाजूने गडी बाद होत असताना स्मृती मंधानाने दुसरी बाजू लावून धरली. तिच्या खेळीच्या जोरावर भारताला दीडशेचा टप्पा गाठता आला. रिचा घोषने २० धावांचे योगदान दिले.

स्मृती मंधानाची झुंजार खेळी

शफाली वर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर स्मृतीने जबाबदारीने खेळ केला. तिने एक बाजू लावून धरली. यामुळे हरमनप्रीत कौरला मुक्तपणे फटकेबाजी करता आली. स्मृतीने ५१ चेंडूत ७० धावांची खेळी साकारली. यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

भारताने विजयासाठी दिलेले १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर टॅमी ब्यूमोंट वैयक्तिक ११ धावांवर बाद झाली. तिला दीप्ती शर्माने पायचित केले. यानंतर डॅनियल वॅट आणि नताली सिवर या दोघींनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी करत भारताच्या विजयाच्या आशा संपूष्टात आणल्या. संघाची धावसंख्या १३२ असताना स्नेह राणाने सिवरला बाद केले. सिवरने ३६ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. तर डॅनियल वॅट आणि हीथर नाइट या जोडीने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डॅनियल वॅटने ५६ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८९ धावांची खेळी साकारली. डॅनियल वॅट सामनावीर तर नताली सिवर मालिकावीर ठरली.

हेही वाचा -WI VS AUS : वेस्ट इंडिजने पुन्हा ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा; दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठा विजय

हेही वाचा -अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूवर आली शेती करण्याची वेळ, महाराष्ट्रीयन असल्याने त्रास होत असल्याचा केला आरोप

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details