चेस्टर ली स्ट्रीट (इंग्लंड) - श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच तीन सामन्याची टी-२० मालिका पार पडली. यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाचा ३-० ने धुव्वा उडवला. आजपासून उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. आज या मालिकेतील पहिला सामना चेस्टर ली स्ट्रीटच्या मैदानावर रंगला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने या सामन्यात फेकलेल्या चेंडूचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा श्रीलंकेचा संघ इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर १८५ धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेचा या डावात इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडने वानिंदू हसरंगा याला एक असा चेंडू फेकला की, त्यावर हसरंगा बाद होता होता बचावला. आपण फेकलेला चेंडू पाहून खुद्द मार्क वूड हाच आश्चर्यचकित झाला.
श्रीलंकेच्या डावातील १३व्या षटकात मार्क वूडने वानिंदू हसरंगा याला तो चेंडू फेकला. त्या चेंडूवर हसरंगा बचावला. कारण चेंडू स्टम्पला लागला नाही. दरम्यान, मार्क वूड याने मीडल स्टम्पवर चेंडू फेकला होता. परंतु चेंडू अचानक स्विंग झाला आणि तो स्टम्पबाहेर निघाला. फलंदाज हसरंगा याला तो चेंडू खेळताच आला नाही. आपण बाद झालो का, हे त्याने मागे वळून पाहिले. पण नशिबाने त्याला साथ दिल्याचे पाहायला मिळाले. मार्क वूडने फेकलेला चेंडू परफेक्ट आऊटस्विंगर होता.
चेंडू फेकल्यानंतर मार्क वूड अनेकदा स्क्रीनकडे पाहत स्मितहास्य करताना पाहायला मिळाला. मार्क वूडचे एक्सप्रेशन पाहून लक्षात येते की, तो देखील आश्चर्यचकित झाला होता. दरम्यान, या क्षणाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहते यावर कमेंट करत आहेत.