चेस्टर ली स्ट्रीट (इंग्लंड) - टी-२० मालिकेत क्लिन स्वीप मिळाल्यानंतरही श्रीलंका संघाने आपली कामगिरीत सुधारणा केली नाही. इंग्लंडने श्रीलंकेचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेला १८५ धावांत रोखले. त्यानंतर हे आव्हान ३४.५ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो आणि लिओम लिविंगस्टोन या सलामीवीर जोडीने ४.५ षटकात ५४ धावांची सलामी दिली. बेयरस्टोने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. लिविंगस्टोनला (९) करुणारत्ने याने चमिराकरवी झेलबाद केले. लिविंगस्टोन पाठोपाठ जॉनी बेयरस्टो देखील माघारी परतला. त्याला फर्नांडोने क्लिन बोल्ड केले. पण बेयरस्टो याने २१ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावा चोपल्या.
कर्णधार इयॉन मॉर्गन (६), सॅम बिलिंग्ज (३) स्वस्तात बाद झाले. मॉर्गन आणि बिलिंग्ज यांना चमिराने बाद केले. जो रुटने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूने त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. संघाची धावसंख्या १७१ असताना मोईन अली चमिराच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. तेव्हा रुट आणि सॅम कुरेन यांनी संघाच्या विजयावर शिक्कोमोर्तब केले. रुटने ८७ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. तर सॅम कुरेन ९ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. कुशल परेरा (७३) आणि वाहिंदू हसरंगा (५४) आणि चमिका करुणारत्ने (नाबाद १९) वगळता एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेचा संघ ४२.३ षटकात १८५ धावांवर सर्वबाद झाला. ख्रिस वोक्सने १० षटकात १८ धावा देत ४ गडी बाद केले. विशेष म्हणजे वोक्सने १० पैकी ५ षटके निर्धाव फेकली. डेव्हिड विलीने तीन गडी बाद करत वोक्सला चांगली साथ दिली. मोईन अलीने १ गडी बाद केला. तर दोन गडी धावबाद झाले.