लंडन - बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडच्या नवख्या संघाने पाकिस्तानचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील पराभव करत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने पाहुण्या संघाचा ५२ धावांनी पराभव केला. लॉर्ड्स येथे पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ ४५.२ षटकात २४७ धावांवर ऑलआउट झाला. हसनने ५१ धावा देत ५ गडी बाद केले. मात्र पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडचे आव्हान पूर्ण करू शकले नाही, त्यांचा संघ ४१ षटकात १९५ धावांवर ऑलआउट झाला.
पावसामुळे दुसरा सामना ४७-४७ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. पण तिसऱ्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पाकिस्तान संघाला इशारा दिला आहे.
सामना संपल्यानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, 'भलेही आम्ही मालिका जिंकलेली असू पण आम्ही तिसऱ्या एकदिवसीय सामना हलक्यात घेणार नाही. आम्ही विजयी लय कायम ठेऊ इच्छित आहोत. अखेरच्या सामन्यात देखील आम्ही विजयाच्या ध्येयानेच मैदानात उतरू आणि विरोधी संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू.'