लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यास बरेच दिवस असल्याने खेळाडूंना सुट्टी देण्यात आली आहे. भारतीय खेळाडू यामुळे इंग्लंडमध्ये भटकंती करताना पाहायला मिळाले.
इंग्लंड दौऱ्याला भारतीय संघातील खेळाडूंना आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे खेळाडूंबरोबर सध्या इंग्लंडमध्ये त्यांचे कुटुंबिय देखील आहेत. सद्या सुट्टी देण्यात आल्याने खेळाडू भटकंती करत आहेत. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आपापल्या कुटुंबासमवेत फिरताना पाहायला मिळाले.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रहाणेची पत्नी राधिका आणि मुलगी आर्या दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत रोहित शर्मा पत्नी रितीका आणि मुलगी समायरासोबत पाहायला मिळत आहे. तसेच मयांक अगरवालने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी अशिता आहे. तसेच त्यांच्याबरोब इशांत शर्मा आणि त्याची पत्नी प्रतिमा दिसत आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील कॉफी शॉपमध्ये पत्नी अनुष्का शर्मा सोबत वेळ घालवताना दिसून आला.