हेडिंग्ले - भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले कसोटी सामन्याला सुरूवात होण्याआधी यजमान संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंग्लंड संघातील इतर फलंदाजांनी कर्णधार जो रुटला फलंदाजीत साथ दिली पाहिजे, असे म्हटलं आहे. बटलरच्या मते, संघातील इतर फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंघम येथे खेळला गेलेला पहिला सामना पावसामुळे ड्रॉ राहिला. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत हा सामना 151 धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण झालेल्या दोन सामन्यात जो रुट वगळता इंग्लंडचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले. यामुळे त्यांना दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला.
उभय संघात आजपासून हेडिंग्ले येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. या सामन्याआधी यष्टीरक्षक जोस बटलर म्हणाला की, 'संघातील इतर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि कर्णधार जो रुटला सपोर्ट करावं लागेल.'