लंडन - भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. यामुळे इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघात मोठा बदल केला आहे. पाचव्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि फिरकीपटू जॅक लीच याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.
जोस बटलरच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. त्यामुळे जोस बटलरने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने निवेदनात सांगितलं की, चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्ज काउंटी संघासोबत जोडला गेला आहे.
दरम्यान, इंग्लंड संघाने 2017 पासून मायदेशात भारताविरुद्ध खेळताना मालिका गमावलेली नाही. पण सुरू असलेली मालिका गमवण्याची भिती त्यांना निर्माण झाली आहे. यामुळे यजमान इंग्लंडचा संघ दबावात आहे.
पहिले चार कसोटी सामने खेळलेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला पाचव्या सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते. त्याच्या जागेवर मार्क वूडला अंतिम संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, उभय संघातील पाचव्या सामन्याला 10 सप्टेंबरपासून ओल्ड ट्रेफोर्डमध्ये सुरूवात होणार आहे.