लीड्स - इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात अडचणीत आला आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अवघ्या 21 धावांत भारताचे अव्वल 3 फलंदाज माघारी परतले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली. विशेष म्हणजे तीनही विकेट अँडरसन यानेच घेतले.
विराट कोहलीच्या करियरमधील आजचा 95वा कसोटी सामना आहे. तो कसोटी करियरमध्ये 149व्यांदा बाद झाला. यात जेम्स अँडरसन याने विराटला सर्वाधिक वेळा बाद केले. अँडरसनने विराटला 7 वेळा तंबूत धाडलं आहे. अँडरसन शिवाय ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिओन याने देखील विराट कोहलीला सर्वाधिक 7 वेळा बाद केले आहे.
जेम्स अँडरसन याने विराटला 7 पैकी 6 वेळा इंग्लंडमध्ये खेळताना बाद केले आहे. यात विराट सहाही वेळा झेलबाद झाला आहे. स्टुअर्ट ब्राँड, मोईन अली आणि बेन स्टोक्स यांनी विराटला प्रत्येकी 5-5 वेळा बाद करण्याचा कारनामा केला आहे. याशिवाय पॅट कमिन्सने देखील पाच वेळा विराटला बाद केले आहे.