ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यात ओवलमध्ये चौथा कसोटी सामना रंगला आहे. उभय संघातील या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात होण्याआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
बीसीसीसीआयच्या मेडिकल टीमने शनिवारी रवी शास्त्री यांचा लेटरल फ्लो टेस्ट केला होता. यात ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतर सावधानता म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरेपिस्ट नितिन पटेल यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला.
खेळाडूंची आर-टीपीसीआर चाचणी
रवी शास्त्री यांच्यासह सर्वांची आर-टीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे आणि ते सर्वजण हॉटेलमध्येच राहतील. जो पर्यंत मेडिकल टीमकडून परवानगी मिळत नाही, तो पर्यंत ते भारतीय संघासोबत जोडले जाऊ शकत नाहीत. दरम्यान, भारतीय संघातील इतर सदस्यांची देखील दोन वेळा (काल रात्री आणि आज सकाळी) लेटरल फ्लो टेस्ट करण्यात आली. यात निगेटिव्ह आलेल्या सदस्यांना ओवलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.