ओवल - भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज के एल राहुलवर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. इंग्लंडविरुद्ध ओवल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी राहुलने आयसीसी आचारसंहितेचा भंग केला. यामुळे त्याची सामन्यातील 15 टक्के फी कापण्यात येणार आहे. राहुलने आयसीसी आचारसंहिता कलम 2.8 चे उल्लंघन केले. या कलमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाच्या निर्णयावर नाराजी दर्शवल्याने कारवाई करण्यात येते. सामना शुल्काच्या 15 टक्के दंडाव्यतिरिक्त राहुलच्या शिस्तीसंबंधी रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पाँईटदेखील जोडला गेला आहे. गेल्या 24 महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा पहिला डिमेरिट पाँईट आहे.
नेमकी काय आहे घटना
ही घटना शनिवारी भारताच्या दुसऱ्या डावातील 34 व्या षटकातील आहे. डीआरएस घेतल्यानंतर झेलच्या निर्णयावर राहुलनेअसहमती दर्शवली. घडले असे की, जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जॉनी बेअयस्टोने त्याचा झेल घेतला. तेव्हा मैदानावरील पंचांनी त्याला नॉटआऊट ठरवले. तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी राहुलला बाद ठरवले. या निर्णयावर राहुल नाराज दिसला. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.