लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक अवस्थेत पोहोचला आहे. भारताने चौथ्या दिवसाअखेर 6 बाद 181 धावा केल्या आहेत. भारताकडे 154 धावांची आघाडी झाली आहे. अंधूक सूर्य प्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता.
के. एल. राहुल आणि रोहित शर्मा या जोडीला दुसऱ्या डावात मोठी सलामी देता आली नाही. मार्क वूडने राहुलला (5) बाद करत भारताला पहिला धक्का दिला. उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर राहुलच्या बॅटची कड घेऊन तो यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातामध्ये विसावला. दुसरीकडे रोहित शर्माने (21) डावाला आत्मविश्वासाने प्रारंभ केला. त्याने मार्क वूडच्या पुढच्याच षटकात षटकार खेचला. परंतु अखेरच्या चेंडूवर नियंत्रित फटका खेळण्यात तो अपयशी ठरला.
भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. सॅम कुरेनच्या उजव्या यष्टीवरील चेंडूवर तो जोस बटलरकरवी झेल बाद झाला. त्याने 20 धावा केल्या आणि उपाहारापर्यंत भारताची अवस्था 3 बाद 56 अशी झाली.