नवी दिल्ली : आज ईद उल फित्र आहे. मुस्लिम धर्माचा हा पवित्र सण देशभरात एकोप्याने साजरा केला जात आहे. या सणाला लोक एकमेकांना मिठी मारून आनंद वाटतात. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांचे वडील महमूद खान पठाण यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये इरफान आणि युसुफ वडिलांसोबत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी या व्हिडिओमध्ये चाहत्यांसाठी एक खास संदेशही दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.
पठान बंधूंनी वडिलांसोबत दिल्या ईदच्या शुभेच्छा : शुक्रवार 21 एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम समाजातील लोक शनिवार 22 एप्रिल रोजी ईदचा सण आनंदात साजरा करत आहेत. आज या शुभ मुहूर्तावर नवीन कपडे परिधान करून लोक एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा देतात. इरफान पठाणने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पठाणने लोकांना संदेश दिला आहे की, 'अल्लाने तुमची प्रार्थना स्वीकारावी आणि तुमचे पुढील वर्ष खूप आनंदी जावो'. यानंतर इरफान पठाणचे वडील मेहमूद खान पठाण देखील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी कामना करताना दिसतात. यानंतर युसूफ आणि इरफान पठाण त्यांच्या चाहत्यांना ईद मुबारक म्हणत ईदच्या शुभेच्छा देतात.