कोलकाता : 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाले की, जगभरातील कोणत्याही क्रिकेट संघासाठी इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच कठीण असते. येथे वेगवान गोलंदाजांना मिळणाऱ्या अतिरिक्त स्विंगमुळे फलंदाजांना त्यांना सामोरे जाणे अधिक कठीण होते.
भारताची फलंदाजी मजबूत : फायनल सामन्यासाठी भारतीय संघ गोलंदाजांच्या निवडीबाबत जरी गोंधळात असला तरी फलंदाजांमध्ये शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे या फलंदाजांची निवड जवळपास पक्की आहे. तसेच 7 जून रोजी ओव्हल येथे होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी हवामान देखील खेळाला अनुकूल असण्याची अपेक्षा आहे.
भारत दोन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता : टीम इंडियातील सूत्रांनी सूचित केले आहे की, भारत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. भारताने दोन फिरकीपटू खेळवल्यास रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांचे प्लेइंग 11 मधील स्थान पक्के आहे.
दोन्ही संघ संतुलित : भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांना वाटते की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन आघाडीच्या संघांमधील हा अंतिम सामना रंजक असेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला ईटीव्ही भारतशी बोलताना ते म्हणाले की, 'दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. तसेच दोन्ही संघ संतुलित आहेत. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. मला आशा आहे की सामन्याच्या कोणत्याही दिवशी पाऊस व्यत्यय आणणार नाही.'