हैदराबाद Diana Edulji Exclusive Interview : "क्रिकेटमधील तीन महान खेळाडू आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे नवीन खेळाडू बनले आहेत", असं आयसीसीनं आपल्या निवेदनात नमूद केलं आहे. या क्रिकेटपटूंच्या समावेशामुळे आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सन्मानित झालेल्या एकूण क्रिकेटपटूंची संख्या 112 झाली आहे. या यादीत 8 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यात सुनील गावस्कर, बिशनसिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मंकड आदी दिग्गजांचा समावेश आहे. आता त्यात डायना एडुल्जी आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश झाला आहे.
डायना एडुल्जींचा सन्मान हा ऐतिहासिक क्षण :डायना एडुल्जी या ICC हॉल ऑफ फेम सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण आहे. आयसीसीनं आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील त्यांच्या नेतृत्वात खेळवण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान केला आहे. डायना एडुल्जी यांनी 1978 आणि 1993 मध्ये भारताचं नेतृत्व केलं. डायना यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यातील अर्धशतक आणि 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6-64 अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली आहे.
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी महिला :आयसीसीनं डायना एडुल्जी यांचा सन्मान केल्यानंतर त्यांच्या उत्कृष्ठ खेळाची प्रशंसा केली. "डायना एडुल्जी 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी महिला आहेत. त्यांनी भारतीय संघ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत", असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.
भारतीय महिलांचा सन्मान :आयसीसीनं हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्यानंतर डायना एडुल्जी यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी "हा भारतीय महिला क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी मोठा सन्मान आहे" असं ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केलं. "या कामगिरीबद्दल मी आयसीसी आणि हॉल ऑफ फेम वोटींग कमिटीचे आभार मानू इच्छिते. हे पूर्णपणानं अनपेक्षित होतं. माझ्या पाठीशी उभं राहून मला मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाला मी हा सन्मान समर्पित करते"असंही एडुल्जीनं यावेळी सांगितलं. "आमच्या काळात मीडिया कव्हरेज नसल्यानं अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. मात्र, आपल्या देशासाठी आणि क्रिकेटसाठी सारं काही करण्याचा आवेश होता. आता आयसीसीकडून मिळालेला सन्मान हा संपूर्ण महिला क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण आहे" असं त्यांनी सांगितलं.
महिला क्रिकेटची प्रगती पाहून आनंद :माजी भारतीय क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी जागतिक स्तरावर महिला क्रिकेटची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. आयसीसी ट्रॉफी जिंकून भारताच्या अंडर-19 मुलींच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना प्रोत्साहित केलं. त्या म्हणाल्या, "आमच्या तरुण क्रिकेटपटू मुलींनी अंडर-19 मध्ये यश मिळवलं. त्याप्रमाणे वरिष्ठ खेळाडूंनी पुढं येऊन आयसीसी ट्रॉफी घरी आणावी, अशी माझी इच्छा आहे" असंही डायना यांनी स्पष्ट केलं. नवोदित महिला क्रिकेटपटूंना संदेश देताना डायना एडुल्जी यांनी "आता मुलीही क्रिकेटला आपलं करिअर बनवू शकतात. महिलांनी पुरुषांप्रमाणं पुढं जाऊन क्रिकेटमध्ये भारताला अधिक गौरव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. चिकाटी आणि आवश्यक कौशल्यं बाळगून खेळल्यास तुम्हाला कोणीही अडवणार नाही" असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वषकाच्या अंतिम सामन्यात दिसू शकतात 'हे' दोन संघ; बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे यांचे भाकित
- Mohammed Shami : वडीलच होते पहिले प्रशिक्षक, शेतामध्ये शिकला स्विंग बॉलिंग; जाणून घ्या शमीचा आतापर्यंतचा प्रवास
- Ex Cricketer Anshuman Gaikwad : यंदाचा विश्वचषक आपणच जिंकणार; माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास