नवी दिल्ली- श्रीलंकेच्या दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी जाणाऱ्या पांढऱ्या बॉलच्या टीममध्ये वेगवान गोलंदाज दीपक चहरची निवड झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या मदतीमुळे आपला समावेश पॉवर प्ले बॉलर्समध्ये झाल्याचे चहरने म्हटले आहे.
''माही भाईने मला पॉवर प्ले बॉलर बनवले. तो मला नेहमी म्हणायचा तू पॉवर प्ले बॉलर आहेस. त्याने बऱ्याच वेळेला पहिल्या ओव्हर्ससाठी बॉल हातात दिला होता. माझ्यावर तो खूप रागावलादेखील पण का ते मला माहिती आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा मला फायदाच झाला आणि मला चांगला बॉलर होण्साठी मदत झाली.'', असे चहरने मीडियाशी बोलताना सांगितले.
स्थगितकरण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चहरने सीएसकेसाठी नवीन बॉल टाकला आणि दोन सामन्यांमध्ये विकेट्सही त्याने घेतल्या. त्याने दोन चार विकेट्स घेतल्या आणि धोनीने त्याचे संपूर्ण गोलंदाजीचे स्पेल एकाच दमात करण्याची परवानगी दिली. सुरुवातीला गोलंदाजी करण्यास मिळाल्यामुळे त्याची क्षमता वाढली.
पंजाब विरुध्दच्या सामन्यात त्याने १३ धावात चार विकेट्स घेतल्या होत्या आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुध्दच्या सामन्यात त्याने २९ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या.
"माहीभाईंच्या नेतृत्वात खेळायचे हे माझे खूप पूर्वीचे स्वप्न होते. त्याच्या नेतृत्वात मी बरेच काही शिकलो आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मी माझा खेळ दुसर्या स्तरावर नेला आहे. त्याने मला नेहमी पाठिंबा दिला आहे. त्याने जबाबदारी कशी घ्यावी हे मला शिकवले. पॉवरप्लेमध्ये तीन षटके गोलंदाजी करणारा माझ्या संघात (सीएसके) कोणी नाही. मी ते करतो, ते माही भाईमुळे. संघासाठी पहिले षटक टाकणे सोपे काम नाही. काळानुसार मी सुधारलो आणि विशेषत: टी -२० मध्ये धावांचा प्रवाह कसा नियंत्रित करायचा, हे शिकलो आहे.'', असे चहर पुढे म्हणाला.