मुंबई:आयपीएल 2022 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मागील काही दिवसापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात अनेक कोविड-19 ची पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली होती. ज्यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स या सर्व अडचणींतून सावरल्यानंतर नुकतेच पुनरागमन करणार होते की, त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका नेट गोलंदाजाला कोरोनाची लागण ( Delhi Capitals net bowler Corona infects ) झाली आहे.
स्पोर्टक्रीडाच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या नेट गोलंदाजाची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नेट गोलंदाजाला अन्य गोलंदाजासह अलग ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या कोविड-19 प्रोटोकॉलनुसार ( BCCI Covid-19 protocol ), रविवारी संध्याकाळी सामन्यापूर्वी संपूर्ण दिल्ली संघाला दुसऱ्या फेरीतून जावे लागेल. नेट गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कातील इतर खेळाडूंना खोलीतच राहण्याची सूचना दिली गेली आहे. तसेच भारतीय बोर्डाच्या कोविड नियमांनुसार, दिल्ली संघातील सर्व खेळाडूंची अजून एकदा कोविड चाचणी केली जाईल. तोपर्यंत सर्व खेळाडू त्यांच्या खोलीत आयसोलेशनमध्ये राहतील.