दुबई -दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्रात दमदार सुरूवात केली. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 8 गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. पण यादरम्यान, दिल्लीला एक धक्का बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याला दुखापत झाली आहे. यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मार्कस स्टॉयनिसचे मांसपेशी ताणले गेले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग स्टॉयनिसच्या रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत.
सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मार्कस स्टॉयनिस दुसरे षटक फेकण्यासाठी आला. तेव्हा त्याचे मांसपेशी ताणले गेले. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने या सामन्यात फक्त सात चेंडू फेकले.
मार्कस स्टॉयनिस दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाची देखील डोकेदुखी वाढली आहे. कारण स्टॉयनिसची निवड टी-20 विश्वकरडंक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आली आहे आणि टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा खेळाडू आहे.