नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना जिंकला आहे. 11 चेंडू बाकी असताना 6 विकेटने त्यांनी हा सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघ ब गटात अव्वल स्थानावर कायम आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर हा सामना खेळवला गेला. भारताची फिरकीपटू दीप्ती शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध अविश्वसनीय खेळी केली. तिने तीन विकेट घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या या दमदार कामगिरीमुळे दीप्ती शर्माला सामनावीर घोषित करण्यात आले. दीप्ती शर्माने सामन्यात 4 षटकात 15 धावा देत 3 बळी घेतले. या दरम्यान दीप्ती शर्माचा इकॉनॉमी रेट 3.75 होता. सामन्यात त दीप्ती शर्माने 12 डॉट बॉल टाकले.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 18 षटकांत 4 गडी गमावून 119 धावा करत सामना 6 विकेटने जिंकला. यासह दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. T20 फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने 98 बळी घेणाऱ्या पूनम यादवला मागे टाकले आहे. दीप्ती शर्माने एफी फ्लेचरच्या गोलंदाजीवर तिच्या विकेटचे शतक पूर्ण केले. या विकेटसह तिने आयसीसी रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. दीप्तीने 89 सामने खेळले आणि 19.07 च्या सरासरीने 100 बळी पूर्ण केले.