नवी दिल्ली :डब्ल्यूपीएलचा 14 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. दिल्लीने आज गुजरातला हरवले तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. मुंबई इंडियन्सनंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो दुसरा संघ असेल. गुजरातला आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी केवळ एकच विजय मिळवता आला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्लीने खेळलेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.
गुजरात जायंट्स शेवटच्या स्थानावर :हरमनप्रीत कौरच्या टीम मुंबई इंडियन्सने 9 मार्च रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीवर 8 विकेट्सने मात केली. कॅपिटल्सने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा दोनदा पराभव केला आहे. याशिवाय 11 मार्च रोजी झालेल्या सामन्यात मेगच्या संघाने जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा यूपी वॉरियर्सशी सामनाही झाला होता ज्यात त्यांनी 42 धावांनी विजय मिळवला होता. मुंबई इंडियन्स 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपी वॉरियर्स चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सचेही 2 गुण असून ते शेवटच्या स्थानावर आहेत.