अमरावती Ambati Rayudu : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू राजकारणाच्या खेळपट्टीवर दोन आठवडेही टिकू शकला नाही. 28 डिसेंबरला वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झालेल्या रायडूनं 6 जानेवारीला पक्षाचा राजीनामा दिला. आपल्या अचानक घेतलेल्या या निर्णयामागचं कारण न सांगता रायुडू म्हणाला की तो योग्य वेळी त्याच्या पुढील वाटचालीची घोषणा करेल.
अंबाती रायुडूची 'X' वर पोस्ट : "मी सर्वांना कळवू इच्छितो की मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे," असं अंबाती रायुडूनं 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं. पुढील निर्णय योग्य वेळी कळवले जातील असंही तो म्हणाला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता : अंबाती रायुडूनं मे 2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात त्यानं आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSRCP मध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, उपमुख्यमंत्री के नारायण स्वामी आणि खासदार पी मिथुन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षात समावेश करण्यात आला होता. मात्र आता त्यानं अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.