गुंटूर : 2023 च्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणारा अंबाती रायुडू आता राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. रायुडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस पार्टी (YSRCP) ची सदस्यता घेण्याची शक्यता आहे. आयपीएल जिंकल्यानंतर त्याने 8 जून रोजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली होती.
रायुडू ग्रामीण भागाला भेट देत आहे : 37 वर्षीय अंबाती रायुडूने 29 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जसाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला. त्यानंतर त्याने त्याच्या मूळ गुंटूर जिल्ह्याच्या दौऱ्यात राजकारणात जाण्याचे हेतू स्पष्ट केले. अंबाती रायुडू हा जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाकडून त्याची नवीन राजकीय इनिंग सुरू करेल. स्थानिक माध्यमांत म्हटले आहे की, अंबाती रायुडू गेले काही दिवस तळाच्या पातळीवरील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी गुंटूर जिल्ह्याला भेट देत आहे. रायुडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश आणि राज्याच्या विभाजनानंतर आता तेलंगणाचा भाग असलेल्या हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
लोकांच्या सेवेसाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची नाडी जाणून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे ठरवले आहे. - अंबाती रायुडू