हैदराबाद Cricket Year Ender 2023 : भारतीय संघानं या वर्षी एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी विजेतेपद गमावलं असलं तरी, 2023 हे वर्ष भारतीय संघ तसंच जागतिक क्रिकेटसाठी खूप खास ठरलंय. जागतिक क्रिकेटमध्ये यावर्षी अनेक नवनवीन विक्रम नोंदवले गेले. तसंच भारतीय संघानंही सरत्या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केलीय. विश्वचषक सोडला तर अनेक मोठे पराक्रम भारतीय संघानं केले आहेत. 2023 मध्ये भारतीय संघ तसंच जागतिक क्रिकेटमध्ये कोणते पराक्रम झाले, यावर एक नजर टाकूया.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : 2023 च्या सुरुवातीला भारतीय संघानं क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. भारतानं सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाचा सामना खेळला. मात्र या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
रिंकूचे सलग पाच षटकार : या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं सलग 5 षटकार मारुन आपली प्रतिभा सिद्ध केली. रिंकूने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारुन गुजरात टायटन्सच्या खिशातला विजय हिसकावून घेतला होता. या सामन्यानंतर रिंकूनं मागं वळून पाहिलं नाही. आता तो भारतीय संघात फिनिशर म्हणून खेळत आहे.
पाच वर्षांनी जिंकला मल्टीनॅशनल चषक : यावर्षी भारतीय संघानं पाच वर्षांनंतर मल्टीनॅशनल चषक जिंकलाय. भारतीय संघानं या वर्षी श्रीलंका आणि पाकिस्ताननं आयोजित केलेल्या आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेतील विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघानं श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला होता.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघ 'नंबर वन' : या संपूर्ण वर्षात भारतीय संघानं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये दमदार कामगिरी केलीय. या वर्षी भारतीय संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन संघ होता. यासह भारतीय संघ ही कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेनंतरचा दुसरा संघ ठरलाय.
सलग दहा सामने जिंकत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात : विश्वचषकाचा अंतिम सामना वगळता भारतीय संघानं यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार खेळ केला. क्रिकेटच्या या महाकुंभात भारतीय संघानं सलग दहा सामने जिंकून विजेतेपदाच्या लढतीत स्थान मिळवलं होतं. मात्र, इथं संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, भारतीय संघानं या स्पर्धेत आपल्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली.
ऑस्ट्रेलियाचा तिन्ही प्रकारात पराभव : यावर्षी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र या दोन विजेतेपदाच्या लढतींव्यतिरिक्त वर्षभरात भारतीय संघानं कांगारुंवर वर्चस्व गाजवलं. या कालावधीत, भारतीय संघानं कसोटीत (2-1), एकदिवसीय (2-1) आणि टी-20 (4-1) या तिन्ही प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय.
रिकाम्या मैदानावर विश्वचषकाची सुरुवात : 2023 चा पुरुषांच्या विश्वचषकाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. देशभरातील 10 मैदानांवर विश्वचषकांच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्घेचा पहिला सामना जगातील सर्वात मोठं मैदान नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्याकडं मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
क्रिकेटला मिळाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश : ऑक्टोबरमध्ये यजमान शहरानं विनंती केल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (IOC) 2028 साली लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पाच खेळांपैकी क्रिकेटचाही समावेश केला. ऑलिम्पिक खेळात 1900 मध्ये क्रिकेटला शेवटचा प्रवेश मिळाला होता. लॉस एंजेलिस गेम्समध्ये सहा संघ सहभागी होण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक : भारतानं जेव्हा आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली, तेव्हा विराट कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 47 शतकं होती. तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमापेक्षा दोन शतकं मागे होता. या विश्वचषक स्पर्धेत त्यानं तीन शतकं झळकावत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकांचा विक्रम केलाय.
ग्लेन मॅक्सवेलची विश्वविक्रमी खेळी : विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 91-7 अशी होती. अशी स्थितीत ग्लेन मॅक्सवेल खेळपट्टीवर आला आणि त्यानं ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकवून दिला. या सामन्यात मॅक्सवेलनं 201 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना केलेली ही खेळी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी ठरलीय.
ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता : यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमान भारतीय संघाचा पराभव करत विक्रमी सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. विशेष म्हणजे भारतीय संघानं सलग दहा सामने जिंकून अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या ट्रविस हेडच्या शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वविजेता बनवलंय.
अफगाणिस्ताननं सर्वांना केलं आश्चर्यचकित : विश्वचषकात अफगाणिस्तान संघानं उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अफगाणिस्ताननं विश्वचषकातील 9 सामन्यांत 4 विजय आणि 5 पराभवांसह 5व्या क्रमांक पटकावला. यामुळं अफगाणिस्तानचं नावही विश्वचषकातील बलाढ्य संघांमध्ये सामील झालंय. विशेष म्हणजे त्यांनी इंग्लंड आणि पाकिस्तान या विश्वविजेत्या संघाचा पराभव केला होता.
आयपीएलमध्ये विक्रमी बोली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत झाला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) तब्बल 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलं. तसंच त्याआधी ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादनं 20.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
हेही वाचा :
- IPL 2024 Auction : ७२ खेळाडूंवर २३० कोटी रुपये खर्च! स्टार्क-कमिन्स मालामाल, स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड
- भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी, एक नजर या अप्रतिम प्रवासावर