महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात 'हे' 8 खेळाडू ठरले प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, यावेळी कोणाचा नंबर? - आयसीसी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा किताब

Cricket World Cup : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांचे खेळाडू आपल्या संघाला विश्वविजेता बनवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावतात. पण, प्रत्येक विश्वचषकात असा एक खेळाडू असतो, जो आपल्या विलक्षण कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतो, आयसीसी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा किताब जिंकतो. आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी विश्वचषकाच्या इतिहासात प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब पटकावला आहे.

Cricket World Cup
Cricket World Cup

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:43 PM IST

हैदराबाद Cricket World Cup : क्रिकेट विश्वचषकात कोण होणार वर्ल्ड चॅम्पियन? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुसरीकडे या विश्वचषकात अनेक दिग्गज खेळाडू अखेरच्या क्षणी दिसणार आहेत, तर काही नव्या ताऱ्यांना क्रिकेटच्या मैदानात चमकण्याची संधी आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. विश्वचषक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीबद्दल सांगायचं तर, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याचा सराव 1992 च्या विश्वचषकापासून सुरू झाला. 1992 ते 2019 पर्यंत, 8 खेळाडूंना विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरीसाठी टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

1992 विश्वचषक - मार्टिन क्रो : 1992 च्या विश्वचषकाचं आयोजन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडनं केलं होतं. पाकिस्तान संघानं अंतिम फेरीत इंग्लंडला पराभूत करून प्रथमच विश्वचषक जिंकला. पण या स्पर्धेत न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो यानं आपल्या उत्कृष्ट फलंदाजीनं सर्वांनाच खिळवून ठेवलं होतं. मार्टिन क्रोनं 9 सामन्यात 456 धावा केल्या, ज्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. मार्टिन क्रो हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलेला एकमेव कर्णधार आहे. या स्पर्धेत मार्टिन क्रोला तीन वेळा सामनावीर घोषित करण्यात आलं आहे.

1996 विश्वचषक- सनथ जयसूर्या : आशियाई संघानं 1996 विश्वचषक सलग दुसऱ्यांदा जिंकला होता. यावेळी श्रीलंका विश्वविजेता बनला होता. खरं तर या विश्वचषकात श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्या, रमेश कलुवितरण यांनी क्रिकेट जगताला पॉवर प्लेमध्ये वेगवान फलंदाजी कशी करावी, हे शिकवलं. श्रीलंकेला चॅम्पियन बनवण्यात या दोघांचेही महत्त्वाचं योगदान होतं. विशेषत: सनथ जयसूर्यानं 6 सामन्यात 221 धावा करत 7 विकेट घेतल्या होत्या. तसंच 5 झेलही घेतले होते. ज्यासाठी त्याची विश्वचषकाचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत सनथला दोनदा सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं होतं.

1999 विश्वचषक - लान्स क्लुसनर : दक्षिण आफ्रिकेचा संघ कधीही विश्वचषक जिंकू शकला नाही, परंतु 1999 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात हा संघ सर्वात मोठा दावेदार म्हणून समोर आला होता. विश्वचषकात लान्स क्लुसनरनं 9 सामन्यांच्या 8 डावात 281 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनं 17 बळीही घेतले होते. पण लान्स क्लुसनरला केवळ प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ट्रॉफीवरच समाधान मानावं लागलं. लान्स क्लुजनरची कामगिरी ही आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचं म्हटलं जात आहे.

2003 विश्वचषक - सचिन तेंडुलकर : 1983, 2011 च्या विश्वचषक विजयाव्यतिरिक्त, टीम इंडियाची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी 2003 मध्ये होती. जेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत 11 सामन्यांमध्ये सचिननं एक शतक आणि 6 अर्धशतकांसह एकूण 673 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरनं स्पर्धेत 61.18 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. या काळात त्यानं 2 विकेट, 4 झेलही घेतले होते. त्यानंतर त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट तसंच गोल्डन बेट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

2007 विश्वचषक - ग्लेन मॅकग्रा :जेव्हा वेस्ट इंडिजनं प्रथमच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केलं होतं, तेव्हा प्रथमच एका गोलंदाजाची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानं एकूण 11 सामन्यात 26 विकेट घेत आपल्या संघाला सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतं बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2011 विश्वचषक - युवराज सिंग : 2011 ला पुन्हा एकदा भारताला विश्वचषकाचं यजमानपद मिळालं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीनं नुवान कुलसेकराच्या चेंडूवर मारलेला षटकार प्रत्येक भारतीय चाहत्यांच्या मनात घर करून आहे. पण या विश्वचषकात भारतीय संघ विश्वविजेता होण्याचं सर्वात मोठे कारण म्हणजे युवराज सिंग. ज्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळं तो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. युवराज सिंग विश्वचषकादरम्यान कॅन्सरशी झुंज देत होता, पण त्यानं आपल्या खेळानं सर्व वेदना कमी केल्या. युवराजनं 9 सामन्यांच्या 8 डावात एक शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीनं 362 धावा करत 15 विकेट्सही घेतल्या. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याची 4 वेळा सामनावीर म्हणून निवड झाली होती.

विश्वचषक 2015- मिचेल स्टार्क : 2015 साली विश्वचषक ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये आयोजित केला होता. यावेळी ऑस्ट्रेलियानं 5व्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर विजय मिळवला होता. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्टार्कनं 8 सामन्यात 10.18 च्या सरासरीनं आणि 3.5 च्या इकॉनॉमी रेटनं 22 बळी घेतले होते. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध 28 धावांत 6 विकेट्सचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात स्टार्कनं किमान दोन बळी घेतला होता. या कामगिरीसाठी त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं होतं. विश्वचषकाच्या इतिहासात गोलंदाजाला ही ट्रॉफी मिळण्याची ही दुसरी वेळ होती. विशेष बाब म्हणजे याआधी 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता.

विश्वचषक 2019- केन विल्यमसन : सन 2019 मध्ये, जवळपास 20 वर्षांनंतर, इंग्लंडला पुन्हा विश्वचषकाचं यजमानपद मिळालं. संघानं विश्वचषक जिंकण्याची ही सलग तिसरी वेळ होती. 2019 मध्ये इंग्लंडचा संघ प्रथमच विश्वविजेता बनला होता. पण या विश्वचषकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं होतं. विल्यमसननं 10 सामन्यांच्या 9 डावात दोन शतके, दोन अर्धशतकांच्या मदतीनं 578 धावा केल्या होत्या. पण फायनलमध्ये इंग्लंडच्या नशिबानं न्यूझीलंडच्या संघानं बाजी मारली. एक चौकार मारल्यामुळं इंग्लंडनं वर्ल्ड कप जिंकला होता. केन विल्यमसन हा विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा कर्णधार आहे, जो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. याआधी न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन 'क्रो'ची 1992 च्या विश्वचषकात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.

यावेळी 'ही' ट्रॉफी कोण जिंकणार? : यावेळी 10 संघांमध्ये विश्वचषक लढत होणार असून अनेक खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन, जो रूट, शाकिब अल हसन, ट्रेंट बोल्ट, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, क्लासेन, मार्टिन गप्टिल, रवींद्र जडेजा, फाफ डुप्लेसिस सारखे खेळाडू आहेत. हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल.

तर शुबमन गिल, बाबर आझम, इशान किशन, सूर्य कुमार यादव, इमाम उल हक, नूर अहमद, कॅमेरून ग्रीन, हॅरी ब्रूक, तन्झीम हसन साकिब, मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहीन शाह आफ्रिदी, दुनित वेल्लालघे, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नजमुल हुसेन शांतो, रचिन रवींद्र, मथिशा पाथिराना सारखे युवा आणि उदयोन्मुख खेळाडू प्रत्येक संघात आहेत. यावेळी सिनियर खेळाडूला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळतो की उदयोन्मुख युवा खेळाडू मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details