हैदराबाद : पाकिस्तान क्रिकेट संघ जगातील बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजीची फळी नेहमीच आक्रमक राहिली आहे. वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर सारखे महान वेगवान गोलंदाज या संघात आहेत. त्यांनी त्यांच्या काळात संघाला मोठं यश मिळवून दिलंय. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचं प्रमुख अस्त्र त्यांची वेगवान गोलंदाजी असणार आहे.
1992 एकमेव विश्वचषक जिंकला :1992 मध्ये पाकिस्ताननं पहिला आणि एकमेव एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, परंतु तेव्हापासून हा संघ अद्यापही विश्वचषक जिंकू शकलेला नाही. आता बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ 6 ऑक्टोबरपासून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यावेळी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना त्यांच्याकडून विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा असेल. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांच्यावर असणार आहे. तर फलंदाजीची जबाबदारी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर असेल. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमाननं वनडे फॉरमॅटच्या 77 डावांमध्ये 45.44 च्या सरासरीने धावा करून सर्वांनाच चकित केलं आहे.
पाकिस्तानची ताकद :
वेगवान गोलंदाजी पाकिस्तानचं बलस्थान : या विश्वचषकात पाकिस्तानसाठी हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. शाहीननं पाकिस्तानसाठी 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5.45 च्या इकॉनॉमीने 86 विकेट घेतल्या आहेत. हरिस आपल्या घातक गोलंदाजीनं प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करू शकतो. तो सतत 145 किमी वेगानं चेंडू टाकतो. त्यानं 28 एकदिवसीय सामन्यांमध्ये 53 विकेट घेतल्या आहेत. बाबर आझम हेही या संघाचं बलस्थान मानलं जाऊ शकतं. तो आपल्या उत्कृष्ट फलंदाजीनं प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडू शकतो. त्यानं पाकिस्तानसाठी 58.16 च्या उत्कृष्ट सरासरीनं 5 हजार 409 एकदिवसीय धावा केल्या आहेत.
पाकिस्तानची कमजोरी :वेगवान गोलंदाज नसीम शाहला वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर पाकिस्तानचा संघ कमकुवत झाला आहे. नसीमनं 14 सामन्यात 4.68 च्या इकॉनॉमीसह 32 विकेट घेतल्या आहेत. मुख्य फिरकीपटू म्हणून उपकर्णधार शादाब खान संघात आहे. तो आउट ऑफ फॉर्म दिसत आहे. त्याच वेळी, डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाज चेंडूवर फारसा प्रभाव टाकू शकत नाही. हे दोघेही संघासाठी कमकुवत ठरू शकतात.
पाकिस्तानचा संघ 128 धावांवर सर्व बाद :मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी डळमळीत होण्याची शक्याता आहे. मोठ्या सामन्यांमध्ये कठीण काळात हा संघ कोसळतो. आशिया चषकात भारतानं दिलेल्या 357 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 128 धावांवर सर्व बाद झाला होता. अशा परिस्थितीत संघाची संपूर्ण जबाबदारी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आली आहे. संघाच्या फलंदाजीचा कमकुवतपणा हा चिंतेचा विषय आहे.
संधी :पाकिस्तानचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमला या विश्वचषकात चमकण्याची संधी आहे. या युवा खेळाडूला विश्वचषक संघात स्थान देण्यात आलं असून तो पहिला विश्वचषक खेळणार आहे. त्यानं आतापर्यंत केवळ 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. वसीमला या विश्वचषकात आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.
धोका :इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे संघ आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. हे संघ मोठी धावसंख्या करण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळं त्याचवेळी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला अवघड जाऊ शकतं. भारतीय खेळपट्ट्यांवर लक्ष्याचा पाठलाग करणं पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकतं. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांना दुखापत झाल्यास संघाची गोलंदाजी कमकुवत होईल, जे संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकसाठी काही नियमांमध्ये बदल, काय आहेत बदल जाणून घ्या
- Cricket World Cup 2023 : दक्षिण आफ्रिका 'चोकर्स' टॅग काढणार का?
- Cricket World Cup 2023 : पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमजोरी