हैदराबाद : येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या 2023 क्रिकेट विश्वचषकाची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. या मेगा इव्हेंटला अवघे दोन दिवस उरले असून, विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघाच्या तयारीचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. पाचवेळा विजेतेपदाचा विक्रम जिंकणारा ऑस्ट्रेलिया फेव्हरेटपैकी एक म्हणून स्पर्धेत प्रवेश करेल. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं जूनमध्ये भारताचा पराभव केला होता. आता देखील विश्वचषक विजेतेपदाची चव चाखायला ऑस्ट्रेलियाला आवडेल.
ऑस्ट्रेलियाचं सामर्थ्य :
जबरदस्त गोलंदाजी :ऑस्ट्रेलियाकडं पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड यांच्यासारख्या मजबूत, अष्टपैलू गोलंदाजीचे आक्रमक खेळाडू आहेत. कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूड हे त्रिकूट सर्वात घातक गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. वेगवान गोलंदाजी करण्याची त्यांची क्षमता, तसंच चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची त्यांच्याकडं जादू आहे. खेळपट्टीवरून चेंडू बाऊन्स करण्याची कला देखील त्यांच्यात आहे. लेगस्पिनर ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीमुळं तर विरोधी संघाला घाम फुटतो.
भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव :जानेवारी 2023 पासून, मिचेल स्टार्कनं भारतीय भूमीवर केवळ चार एकदिवसीय सामन्यांमध्ये 24.66 च्या सरासरीनं नऊ विकेट्स घेतल्या आहेत. हेझलवूड दुखापतींमुळं काही दिवस संघाच्या बाहेर होता. पण त्याला भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा मोठा अनुभव आहे. आतापर्यंत त्यानं 74 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26.4 च्या सरासरीनं 4.70 च्या इकॉनॉमीनं 116 विकेट्स घेतल्या आहेत. कमिन्सनं 77 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28 च्या सरासरीनं आणि 5.23 च्या इकॉनॉमीनं 126 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय परिस्थिती आणि खेळपट्ट्या लक्षात घेता ॲडम झाम्पाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30.77 च्या सरासरीनं 27 बळी घेण्याचा त्याचा विक्रम खूप चांगला आहे.
स्फोटक फलंदाजी : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस सारख्या पॉवर हिटर्समुळं दिलेल्या लक्ष्याचा आक्रमकपणे पाठलाग करणं सहज शक्य होतं. स्टीव्ह स्मिथचा अनुभव आणि मार्नस लॅबुशेनची उदयोन्मुख प्रतिभा खेळाला चालना देऊ शकते. जर ओपनींग खेळाडूंना फारसं काही करता आलं नाही तर, मधल्या फळीतील खेळाडू संघाला काहीसं स्थैर्य मिळवून देऊ शकतात. या वर्षी डेव्हिड वॉर्नरनं भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतके केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 390 धावांसह ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी मार्श दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. ज्यानं 10 सामन्यांमध्ये 121.57 च्या सरासरीनं 417 धावा केल्या आहेत. चार अर्धशतकांसह 46.33 च्या सरासरीनं त्याचा धावा करण्याचा रेट आहे. मार्नस लॅबुशेननं यावर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून त्यानं 10 सामन्यांमध्ये 51.55 च्या सरासरीनं धाव केल्या आहेत. ज्याचा स्ट्राइक रेट 93.17 आहे.
अष्टपैलू क्षमता : संघात कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श सारख्या प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे, जे गोलंदाजी देखील करू शकतात, तर ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड कर्णधाराला गुगली गोलंदाजीत मदत करतील. ग्लेन मॅक्सवेलला खेळपट्टीची मदत मिळाल्यास तो 10 षटके टाकू शकतो. राजकोट येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 10 षटकांचा पूर्ण कोटा टाकला होता. सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. स्टॉइनिसनं या वर्षात 7 एकदिवसीय सामन्यात 7 बळी घेतले आहेत. ग्रीननं 7 सामन्यात 5 बळी घेतले आहेत.