चेन्नई Cricket World Cup २०२३: रविवारी विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १९९ धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात कांगारूंचा सहा विकेट्सनं पराभव झाला. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं कबूल केलं की, ऑस्ट्रेलियन फलंदाज चेपॉकच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंविरोधात अपयशी ठरले.
विकेट फिरकी गोलंदाजीसाठी योग्य होती : भारतासाठी डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजानं (३/३८) धारदार गोलंदाजी केली. त्याला कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी चांगली साथ दिली. 'त्यांच्या सर्व फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. ही विकेट फिरकी गोलंदाजीसाठी योग्य होती. ते सर्व अतिशय दर्जेदार फिरकीपटू असल्यामुळं त्यांच्यासमोर खेळणं आव्हानात्मक होतं. त्यांनी मिळून गोलंदाजी केल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष केला', असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला. या सामन्यात स्मिथ ४६ धावा करून रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीत क्लिन बोल्ड झाला.
कोहली-राहुलच्या फलंदाजीचं कोतुक केलं : यावेळी बोलताना स्मिथनं विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. 'विराट आणि राहुल खूप संयमानं खेळले. ते खरोखरच स्मार्ट क्रिकेट खेळले', असं स्मिथ म्हणाला. 'ही अशा प्रकारची विकेट नव्हती जिथे तुम्ही चौफेर फटकेबाजी करू शकता. ते फक्त २०० धावांचा पाठलाग करत असल्यानं ते संयमानं खेळू शकले. तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर भागिदारी करणं आवश्यक होतं जी त्यांनी केली', असं स्टीव्ह स्मिथनं सांगितलं.