रविंद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजाची 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत राजकोट Cricket World Cup २०२३ : स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतानं रविवारी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अवघ्या १९९ धावांवर रोखलं. जडेजानं टर्निंग विकेटचा पुरेपूर वापर करून तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि सामना भारताच्या बाजूनं वळवला.
नयनाबा स्वत: क्रिकेटच्या चाहत्या आहेत :'ईटीव्ही भारत'ने सोमवारी रविंद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजा यांच्याशी खास बातचीत केली. नयनाबा स्वत: क्रिकेटच्या चाहत्या असून, रविवारच्या मॅचमध्ये भाऊ चांगली कामगिरी करेल असा अंदाज त्यांनी आधीच व्यक्त केला होता. इतर लाखो भारतीयांप्रमाणेच त्यांनाही आशा आहे की भारत २०२३ चा विश्वचषक जिंकेल. राजकोटमध्ये 'ईटीव्ही भारत'शी एका खास संवादात नयनाबा म्हणाल्या, 'भारतीय संघानं विजयी सुरुवात केली. मला आशा आहे की ते २०२३ चा विश्वचषक जिंकतील. कालच्या सामन्यात सुरुवातीला मला वाटलं होतं की भारताला जिंकणं कठीण जाईल, मात्र संघानं शेवटपर्यंत जिद्द कायम ठेवली आणि शेवटी सामना जिंकला, असं त्या म्हणाल्या.
भावाच्या कामगिरीनं भारवून गेली : त्या पुढे म्हणाल्या की, 'कालचा सामना खूपच रोमांचक होता. रविंद्रनं चांगली कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीनं मी भारावून गेली आहे. येत्या सामन्यांमध्येही त्याची सर्वोत्तम कामगिरी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत', असं त्यांनी सांगितलं. 'सामन्यांदरम्यान, खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावना त्यांच्यासोबत असतात. त्याचबरोबर, लाखो चाहते देखील खेळाडूसाठी प्रार्थना करत असतात', असं त्या म्हणाल्या.
कुटुंब म्हणून दडपण जाणवतं : आपल्या भावाला खेळताना पाहिल्यावर कसं वाटतं यावर नयनाबा म्हणाल्या, 'जेव्हा तो खेळतो तेव्हा एक कुटुंब म्हणून आम्हालाही थोडं दडपण जाणवतं. डावानंतरच्या त्याच्या आकडेवारीवरून तो किती विकेट घेईल किंवा किती धावा करेल याचा अंदाज मी लावते. उदाहरणार्थ, कालची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकुल होती. मला वाटलं की तो त्या खेळपट्टीवर किमान ३-४ विकेट घेईल आणि शेवटी तसंच झालं. विशेषत: या सामन्यात स्टीव्ह स्मिथची विकेट खूप महत्त्वाची होती. तो खेळाचा टर्निंग पॉइंटही ठरला', असं त्यांनी सांगितलं.
विश्वचषक जिंकण्यासाठी देवीकडे प्रार्थना करेल : बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्यावरही नयनाबा जडेजा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'यावेळी भारतीय टीम वेगळ्या फॉर्ममध्ये दिसत आहे. मला ठामपणे वाटतं की भारत हा सामना जिंकेल', असं त्या म्हणाल्या. 'नवरात्रोत्सव आणि विश्वचषक या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत. आमच्याकडे नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. आम्ही वर्षानुवर्ष देवीची पूजा करतो. मी देवी मातेला प्रार्थना करते की माझा भाऊ त्याची सर्वोत्तम कामगिरी करेल आणि हा भारत विश्वचषक जिंकेल', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :
- Neeraj Chopra Interview : 'ईटीव्ही भारत'वर नीरज चोप्रा Exclusive; म्हणाला, एकदा जिंकलेली सर्व पदकं...
- Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत
- Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन