मुंबई Cricket World Cup 2023 :आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान तब्बल ७ वर्षांनंतर भारतात सामना खेळेल. त्यामुळे दोन्ही देशांचे कोट्यवधी चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहात आहेत.
दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत : भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. भारत पाकिस्तानला भेट देत नाही, तर पाकिस्तानही भारतात सामने खेळण्यासाठी येत नाही. हे दोन संघ केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. २०१६ मध्ये शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ शेवटचा टी २० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता.
पाकिस्तान ७ वर्षांनंतर भारतात खेळेल : आता पाकिस्तानचा संघ ७ वर्षांनंतर भारतात खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान ६ ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघानं आपले दोन्ही सराव सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा न्यूझीलंडनं ५ विकेटनं तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं १४ धावांनी पराभव केला. आता गुरुवारी नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघाला हरवून विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात करण्याची संधी पाकिस्तानकडे असेल.