मॅनचेस्टर - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सामन्यापूर्वीचा त्याचा आणि संघातील इतर खेळाडूंचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
CRICKET WC : सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडू सानियासोबत करत होते पार्टी - सानिया मिर्झा
सामन्यामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
या व्हिडिओमध्ये शोएब मलिकसह वहाब रियाज, इमाम उल हक हे पाकिस्तानी क्रिकेटपटू एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर भारताची स्टार टेनिसपटू आणि मलिकची पत्नी सानिया मिर्झा देखील आहे. या पार्टीचे कारण देत चाहत्यांनी शोएब मलिकला धारेवर धरले आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सानिया मिर्झाने या व्हिडिओबद्दल राग व्यक्त केला आहे. तिने एक ट्विट करुन त्यामध्ये तिने म्हटले आहे, "हा व्हिडिओ आम्हाला न विचारता काढण्यात आला आहे. हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अनादर आहे. आमच्याबरोबर लहान मुलगा होता. आम्ही जेवण करत होतो. आणि हो, सामना हरल्यानंतरही लोकांना खाण्या-पिण्याचे स्वातंत्र्य आहे. पुढच्यावेळी चांगले काहीतरी लिहा."