साउदम्पटन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने अफगाणिस्ताचा ६२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यात ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. तूफान फॉर्मात असलेल्या अष्टपैलू शाकिब अल हसनने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दमदार प्रदर्शन करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाकिब अल हसनने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. शिवाय, त्याने ५ बळी घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी घेणारा शाकिब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह या ५ फलंदाजांना माघारी धाडले. सामन्यात अर्धशतकी खेळी आणि ५ गडी टिपल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.