मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा थरार पाहायला मिळणार आहे. मेन इन ब्ल्यू आणि किवीमध्ये आज हा सामना होणार असून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, दोन्ही संघ मैदानात कसून सराव करताना दिसून आले. टीम इंडियाला मधल्या फळीची तर न्यूझीलंड संघाला सलामीच्या फलंदाजांची चिंता आहे. धोनी, ऋषभ पंत हे सरावामध्ये दणक्यात फटकेबाजी करताना दिसून आले. त्यामुळे आजच्या सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्ययमसन हे ११ वर्षांपूर्वी अंडर १९ विश्वकंडकाच्या उपांत्य सामन्यात समोरासमोर आले होते. योगायोग म्हणजे त्यावेळी दोघेही आपआपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत होते. आता पुन्हा या दोघात आजच्या सामन्यात लढत होणार आहे.
दोन्ही संघ -
- भारत - विराट कोहली (कर्णधार) ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मयंक अगरवाल, रवींद्र जडेजा.
- न्यूझीलंड -केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.