नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. पहिल्या कसोटीत पाच फलंदाजांना माघारी धाडणारा इशांत शर्मा पुन्हा जखमी झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इशांत दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -आयपीएलपूर्वी केकेआरला मोठा धक्का, 'महत्वाचा' खेळाडू स्पर्धेबाहेर
कसोटी क्रिकेटमधील ३०० व्या बळीपासून इशांत ३ पावले दूर होता. मात्र, त्याची ही कामगिरी लांबणीवर पडली आहे. टीम इंडियाकडे दुसरी सुखद बाब म्हणजे, सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ तंदुरुस्त असल्याचे सांगितले जात आहे. वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला १० गडी राखून पराभूत केले. या कसोटीच्या पहिल्या डावात इशांतने पाच विकेट्स घेतल्या होत्या.
२०१८ पासून विदेशी खेळपट्ट्यांवर इशांत हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. या दरम्यान त्याने १३ कसोटी सामन्यात ५३ बळी घेतले. घरच्या मैदानावर उमेश यादवची कामगिरी चांगली आहे. येथे त्याने ७ कसोटीत ३८ बळी घेतले. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा उमेशने आतापर्यंत फक्त ४५ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ३०.२६ च्या सरासरीने १४२ बळी घेतले आहेत.