लंडन -लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे 'विराट' आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३१६ धावांवर सर्वबाद झाल्याने भारताने मोठा विजय मिळवला. भारतासाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ तर युजवेंद्र चहलने २ विकेट घेतले.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शिखर धवनचे ११७ धावा करत दमदार शतक झळकावले. तर रोहित शर्मा (५७) आणि कर्णधार विराट कोहलीने (८२) धावा करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकामध्ये ३५२ धावा फटकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी स्टोयनीसने २ तर कुल्टर-नाईल, स्टार्क आणि कमिन्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतला. या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नव्हते.