साऊदम्पटन - भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात आज पहिल्यांदाच विश्वचषकात सामना होणार आहे. अफगाणिस्तान संघाने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून या पाचही सामन्यात अफगाणिस्तान संघाला पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे भारतीय संघ प्रचंड लयीत आहे. त्यामुळे आज भारतीय संघ अफगाणिस्तानच्या संघाला लोळवण्यास सज्ज झाला आहे. हा सामना साऊदम्पटनच्या द रोज बाऊल मैदानावर दुपारी ३ वाजता खेळण्यात येणार आहे.
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. मात्र तरीही भारताचे आघाडीचे फलंदाज धावांचा डोंगर उभारण्यास उत्सुक आहेत. भारताने बलाढ्य दक्षिण ऑफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघाचा पराभव केला आहे. तर न्युझीलंडसोबतचा सामना पाण्यात वाहून गेला आहे. दुसरीकडे अफगाणीस्तान संघाची विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे १० व्या स्थानी आहे. तर विश्वकरंडकात आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ ७ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.