लॉर्ड्स -विश्वकरंडकाच्या इतिहासामध्ये प्रथमच अंतिम सामना इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड हा बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपरओव्हरमध्येही हा सामना बरोबरीत सुटला. तेव्हा अखेर चौकारांच्या निकषानुसार इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरपूर्वी सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, एका ओव्हरथ्रोने न्यूझीलंडच्या विजयावर पाणी फेरले. आयसीसीच्या ओव्हरथ्रोच्या नियमानुसार सहा नव्हे, तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या, असे माजी पंच सायमन टॉफेल यांनी नियमानुसार दाखवून दिल्याने खळबळ उडाली आहे.
इंग्लंड संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटला जोरदार फटका लगावला आणि राशिदला दोन धावांसाठी कॉल दिला. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या गुप्टीलने काही क्षणात चेंडू उचलून स्टोक्सला बाद करण्यासाठी थ्रो केला. मात्र, हा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. तेव्हा पंचानी पळालेल्या दोन धावा आणि चौकार असे मिळून इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या. पण आयसीसीच्या नियमानुसार पंचानी पाचच धावा देणे अपेक्षित होते.