लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड या दिग्गज संघात लढत होणार आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.
ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या अॅशेसच्या दृष्टीकोनातून हा सामना महत्वाचा ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत ६ पैकी ५ सामने जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. आणि आज त्यांनी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला तर त्यांना अग्रस्थान काबीज करता येईल. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने १५ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच आणि वॉर्नर जबरदस्त फॉर्मात असून इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढण्यासाठी ते उत्सुक असतील.
दुसरीकडे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. २३३ धावांचे आव्हान गाठताना इंग्लंड २१२ धावांवर गारद झाला होता. शिवाय, जेसन रॉय दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्याने इंग्लंडच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.
दोन्ही संघ -
- ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.
- इंग्लंड -ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.